ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीच धरणं आंदोलन

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात  अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर  रेमडेसिवीरचा तुटवडा  आहे.  रुग्णांचे हाल होत असून याच मुद्द्यावरुन   गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ठाण्यात आंदोलन केलं.

 

महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ आंदोलन करत त्यांनी ऑक्सिजन उपलब्ध नसणं महाराष्ट्रासाठी आणि ठाणे शहरासाठी लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी मनसे कार्यकर्त्यांनीही त्यांनी सोबत दिली.

 

ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, नगरसेवक सुहास देसाई उपस्थित होते. दरम्यान आंदोलन सुरू असताना मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे कार्यकर्तेदेखील या आंदोलनात सहभागी झाले.

 

ऋता आव्हाड यांनी  सांगितलं की, “मंत्र्यांची पत्नी तर मी आहेच. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा मी अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहे. ठाण्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर यासंबंधी भयानक अवस्था आहे. ज्या प्रमाणात रुग्ण दाखल आहेत त्याच्या ३० टक्के ऑक्सिजनही रुग्णालयांकडे नाही. परिस्थिती फार बिकट आहे. रुग्णांना दाखल करायचं आहे पण इंजेक्शन, ऑक्सिजन नसल्याने ते दाखल करु शकत नाहीत”.

 

“मोठ्या रुग्णालयांना काही समस्या नाहीत. त्यांच्याकडे येणारे रुग्ण श्रीमंत असतात. ते सुविधा विकत घेऊ शकतात.पण छोट्या रुग्णालयांना समस्या जाणवत आहे,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

 

“केंद्र सरकार आपल्याला निधी देत नाही. सर्व माध्यमांनी या विषयावर १० ते १५ दिवस रान उठवलं. पण कोणाला फरक पडत नाही. जर मला आणि विरोधी पक्षनेत्याला इथे बसावं लागत असेल तर घरात  रुग्ण असणाऱ्या गरीबाचे काय हाल होत असतील हे सांगायची गरज नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. पालिका आयुक्तांना खाली उतरुन परिस्थिती पहावी अशी टीका यावेळी त्यांनी केली.

 

“आम्ही कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाही. शेवटी आज आमचा कडेलोट झाला. माझा नवरा मंत्री असला तरी ऑक्सिजन मिळत नसल्याने आज सकाळपासून मला पाच रुग्णालयांचे फोन आले. जे कोणी मदत करु शकतात त्यांनी रुग्णांसाठी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ववत करावा. अनेक असे छोटे रुग्णालय आहेत ज्यांच्याकडे पाच, दहा आयसीयू बेड्स आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजन नाही. महाराष्ट्रासारख्या इतक्या प्रगत राज्यासाठी आणि ठाण्यासारख्या शहरासाठी ही खूप लाजिरवाणी बाब आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण शेवटी मर्यादा असतात असं सागंत त्यांनी अनेक निधी केंद्राकडे प्रलंबित असल्याचं सांगितलं.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.