टोल प्लाझा बंद करा अन्यथा ‘आरती आंदोलन’ : राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महाजन यांचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी |  महामार्गाचे कामे अपूर्ण असतांनाच टोल प्लाझा सुरू करण्यात आलेला आहे. हा टोल प्लाझा बंद करण्यात यावा अन्यथा मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी  ‘आरती आंदोलन’  करण्याचा इशारा  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  राष्ट्रीय राजमार्ग क्र.53 (जुना राष्ट्रीय राजमार्ग क्र.06) मधील फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली  या दरम्यानचे चौपदीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. सदरचे काम चिखली ते तरसोद पर्यंतचे जवळपास पुर्णत्वास आले आहे. परंतू अजुनपावेतो या गावांदरम्यानची बरीच कामे अपूर्ण आहेत. तरीही या मार्गाचे नशिराबाद येथे टोल प्लाझा सुरू करून टोल वसूली सुरू आहे. संपूर्ण काम पुर्ण झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा टोल (पथकर) स्विकारणे म्हणजे जिझीया करासारखे आहे.

 

यासंदर्भात  वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.  तरसोद ते चिखलीदरम्यान नशिराबाद-जळगांव खुर्द उड्डाण पुल, फेकरी रेल्वे उड्डाण पुल, भुसावळ शहरातील रेल्वेवरील उड्डाण पुल, भुसावळ तालुक्यातील निंभोरा-दिपनगर जवळील रस्त्याचे काम, चिखलीपर्यंत जवळपास सात ते आठ ठिकाणी सुरू असलेली एकतर्फी वाहतुक या सर्व बाबींचे बांधकाम होवून संपूर्ण सुरळीत वाहतुक होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा लागणार कालावधी.

फेकरी टोल प्लाझा तरसोद ते चिखली या 360 कि.मी. ते 422.70 या अंतरात येत असल्याने नशिराबाद टोल नाका व फेकरी टोल प्लाझा या दोघांकडे द्यावा लागणारा कर म्हणजे जनतेची फसवणूक आहे. ती बंद होण्यासाठी फेकरी टोल प्लाझा बंद होणे आवश्यक आहे.  नशिराबादसह कडगांव-जळगांव खुर्द येथील शेतकऱ्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांना करमुक्त करण्यात यावे.फागणे ते चिखली या संपूर्ण मार्गाचे काम पुर्ण झाल्यावरच टोल प्लाझा सुरू करणे.

यानुसार अपूर्ण  नशिराबाद शिवार अंतर्गत कामेही पुर्ण होणे गरजेचे आहे. यात जळगाव ते भुसावळ दरम्यान असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामात नियमाप्रमाणे साईडपट्टी सोडणे आवश्यक आहे. सर्व्हिस  रोड च्या बाजूला लागून केलेली काँक्रीट गटार अतिशय चुकीच्या पध्दतीने बांधली असून शेतकऱ्यांचे शेतातील पाणी वाहून नेण्यास ती असमर्थ आहे. कारण सदरची काँक्रीट गटार उंचावर बांधली असल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाचा विचार न झाल्याने शेतकऱ्यांनाही शेतात पाणी साचून राहण्याच्या समस्या निर्माण होतात.

नशिराबाद शहरातील पोलीस स्टेशनजवळील भुयारी मार्गाची उंची जुळवतांना त्या ठिकाणी कृत्रिम खोली बसविण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण होते व रहदारीस धोकादायक ठरते. त्या ठिकाणी लवकरच जलपुजन आंदोलन करण्यात येणार आहे.

सुनसगांव रस्त्यावरील भुयारी मार्गचुकीच्या पध्दतीने बांधण्यात आला असून सुनसगांव रस्त्यावर रहदारी न होता खाजगी प्लॉटवर रहदारी जात आहे.

महामार्गालगत येणाऱ्या रस्त्यांना 100 फूटापर्यंत बांधकाम करून देणे गरजेचे असल्याने नशिराबाद बस स्टॅण्ड रोड, तरसोद रस्ता, पोलीस स्टेशन रस्ता, रामदेवबाबा मंदीराकडे जाणारा रस्ता, भादली सबस्टेशनकडे जाणारा रस्ता तसेच सुनसगांव भुयारी मार्गापासून सुनसगांवकडे जाणारा रस्ता तयार करायचे काम अद्यापपावेतो झालेले नाही.

वरील सर्व कामे अद्याप अपूर्ण असून काही कामांमध्ये असलेल्या तांत्रिक चुकांचे निराकरण लवकरात लवकर करावे. सदरची पुर्ण कामे झाल्यानंतरच टोल प्लाझा वसूल करावा. सद्यस्थितीत सुरू असलेली टोल वसूली त्वरीत थांबवावी, अन्यथा मंगळवार दि.12 ऑक्टोबर 2021 रोजी टोल नाक्यावर ‘आरती आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!