ज्यांना इतिहास घडविता येत नाही असेच इतिहास पुसतात : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी आयसीएचआर संस्थेने त्यांच्या कार्यक्रमातून पंडित नेहरू यांची प्रतिमा वगळण्याच्या निर्णावर खासदार संजय राऊत यांनी ज्यांना इतिहास घडविता येत नाही असेच इतिहास पुसतात असे म्हणत कडाडून टीका केली आहे.

 

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या रोखठोक या स्तंभातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, इतिहासावर संशोधनावर काम करणार्‍या इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च या संस्थेनं आजादी का अमृत महोत्सवच्या पोस्टरवर पंडित नेहरुंचं चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्र ठळकपणे आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरु , आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरुंना खासकरुन वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

 

 

राऊत यांनी पुढे  नमूद केले आहे की, स्वातंत्र्य लढा हा आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे मनुष्याच्या प्रगतीची व दोषांची नोंद असते. इतिहास म्हणजे त्या त्या कालखंडातील त्या त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विचारांचे, आशा- आकांक्षांचे, घडामोडींचे आणि स्थितीचे प्रतिबिंब असते. त्या घटनांचे, घडामोडींचे, विचारप्रवाहांचे ते एक प्रकारचे विवेचन असते. थोडक्यात, इतिहास हे मानवी समाजाचे एक अखंड, अभंग आणि अविभाज्य छायाचित्रच असते. त्या छायाचित्रांतून पंडित नेहरूंना वगळून कोणाला काय साध्य करायचे आहे?

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!