जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांना अटक!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील पिंपरखेड शिवारात अवैध जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्यां सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड शिवारात रांजणगावाकडे जाणाऱ्या शिव रस्त्यालगतच्या एका शेतीच्या शेजारी बेकायदा जुगार अड्डा खेळत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. लागलीच त्यांनी पुढील कारवाईचे आदेश दिल्यानंतर सपोनि धरमसिंग सुंदरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी शनिवार, ७ रोजी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी पत्याचा जुगार खेळताना सहा जण मिळून आले. त्यांच्याकडून रोकडसह मोटारसायकल व पत्याचा साहित्य असा एकूण ९८,२७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना ताब्यात घेतले. गणेश गोपाळराव देशमुख (वय-३०) रा. घाट रोड, चाळीसगाव, सुमित अंबादास सोनावणे (वय-२६) रा. घाटरोड, चाळीसगाव, जाकीर शेख फारुख (वय-३२) रा. नागद रोड चाळीसगाव, प्रल्हाद दयाराम सूर्यवंशी (वय-३५ ) रा. अहिल्यादेवी नगर चाळीसगाव, राजू हिरालाल कुमावत (वय-२९) पाटणादेवी रोड चाळीसगाव, मुकेश रणछोड राठोड (वय-५०) रा. हिरापूर ता. चाळीसगाव असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोना नितीन आमोदकर, पोना दिनेश पाटील, पोना भगवान पाटील, पोना शांताराम पवार, पोना देवीदास पाटील व पोना ज्ञानेश्वर बडगुजर यांनी केली आहे. दरम्यान पोना ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात महाराष्ट्र जुगार ॲक्ट कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: