जिल्हा रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांकडून गोंधळ; डॉक्टरसह नर्सिंग स्टॉफला धक्काबुक्की

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हल्ला झालेल्या तरुणावर उपचार सुरू असताना नातेवाईक व इतरांनी गोंधळ घालत थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला. या प्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या भांडणाच्या कारणावरून ७ मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास काट्याफाईल भागात राहुल अशोक शिंदे या तरुणाला मारहाण करण्यासह त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना जखमीसोबत आलेले नातेवाईक व मित्रांपैकी काही जण खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याविषयी तर काही जण लवकर उपचार करा, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. एक जण मोबाईलमध्ये शुटींग करीत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनयकुमार यांनी याविषयी विचारणा केली असता पाच ते सहा जण डॉक्टर व नर्सिंग स्टॉफच्या अंगावर धावून आले व धक्काबुक्की केली. यातील एकाने डॉ. अभिनयकुमार यांची कॉलर पकडली.

गोंधळ वाढत जाऊन जखमीचे नातेवाईक व मित्र ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी डॉ. अमोल पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी मनोज उर्फ रवींद्र जयवंत शिंदे (३०, रा. चौघुले प्लॉट) व सुमीत सुनील महाजन (२४, रा. शिवाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोउनि उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.

Protected Content