बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील महाप्रबोधन यात्रेच्या आधी ठाकरे गटात झालेल्या राड्या प्रकरणी उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

बीडचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी काल आपण सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा आरोप केला होता. यानंतर आज सकाळी त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. याच्या पाठोपाठ अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह करत काल काय घडले याचा घटनाक्रम सांगितला.
या संदर्भात सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही गुरुवारी महाप्रबोधन यात्रा होत असलेल्या माने कॉम्प्लेक्स येथे सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत होते. सभास्थळाची पाहणी झाल्यानंतर मी गाडीत बसून फेसबुक लाईव्ह करत होते. त्यावेळी बाहेर आप्पासाहेब जाधव एका माणसाला काहीतरी काम सांगत होते. ते त्याला काहीतरी सूचना देत होते. यात त्याला आप्पासाहेब जाधव यांनी वापरलेली भाषा सहन झाली नाही. त्याने यावर उलट उत्तर दिल्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. तेव्हा उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर मध्ये पडले. आप्पासाहेब जाधव त्यांच्यावर धावून गेले. हे सगळे भांडण सुरु असल्याचे समजल्यानंतर मी इतर पदाधिकार्यांसह तिकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आप्पासाहेब जाधव आपली गाडी घेऊन पळून गेले होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाधव यांचा दावा खोडून काढत कालचा घटनाक्रम सांगितला असून यावर आता जाधव नेमके काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.