जळगावात कृती फाऊंडेशनतर्फे कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । येथील कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती दुकान मालक व दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचाव या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कोरोनाबाबत दुकानदार व ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कृती फाऊंडेशन, जळगाव शहर महानगरपालिका व गोलाणी मार्केट व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनापासून करावयाचा बचाव हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये कोरोना व्हायरस विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली.

कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल, कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, नागरिकांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी, तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणूबद्दल काळजी करू नका, सावध रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा असे सांगितले. त्यानंतर कोरोना आजार लक्षणे व उपाययोजनाच्या माहितीपत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला फाऊंडेशन सचिव जी.टी.महाजन, फाऊंडेशनच्या कार्यध्यक्षा डॉ.श्रद्धा माळी, माधवबागचे हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रेयस महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उपप्रमुख मानसिंग सोनवणे, व्यापारी संघटना अध्यक्ष पूनम राजपूत, गोलाणी मार्केट सिंधी संगतचे अध्यक्ष जवाहर ललवाणी, सचिव महेश चावला, दिपक कुकरेजा, विजय बोरोले व इतर व्यापारी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी गुरुप्रसाद पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!