जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा येथे वार शुक्रवार रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तथा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठी कविता व गाणे, ग्रंथप्रदर्शन, व्याख्यान, माहिती इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.
मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हेमराज पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून अनुभूती स्कूलचे हर्षल पाटील, समन्वयिका वैशाली पाटील उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन तसेच पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय आकाश शिंगाणे यांनी केला. नेहा चव्हाण हिने मराठी दिनाची माहिती सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षल पाटील यांनी भाषा संवर्धनावर व्याख्यान दिले. यात त्यांनी मराठी भाषेचा उगम,शब्द कसे तयार होतात ,मराठी भाषा व त्यातील प्रतिशब्द ,भाषिक ज्ञान कसे वाढवावे,भाषेचे सौंदर्य व सामर्थ्य वृद्धिंगत कसे झाले याचे सोदाहरण मार्गदर्शन केले. उच्चशिक्षित झाल्यानंतर इंग्रजी, हिंदी सारख्या भाषा अवगत करून ग्लोबल झाल्यानंतर आपण आपल्या आईला,मातृभाषेला विसरता कामा नये असा गुरुमंत्र दिला. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी मराठी भाषा असावी ही ईच्छा प्रत्येकाने बाळगून आपल्या मातृभाषेला समृद्ध करावे असा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमराज पाटील यांनी मराठी भाषा कशी विकसित करावी व मराठी भाषा आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मराठी विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी केले. पुस्तक प्रदर्शनीचे नियोजन व मांडणी सोनाली कुलकर्णी गणेश वडोळे यांनी केली. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली पाटील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन व आभार सचिन गायकवाड यांनी मानले.