जळगाव प्रतिनिधी । येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील सातवीतील विद्यार्थी देवेश भय्या याचा बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बालशक्ती पुरस्काराने गौरव करण्यात आला.
देवेश भय्या या विद्यार्थ्याला बालशक्ती पुरस्कार जाहीर झाला होता. दरम्यान, बुधवारी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला हा पुरस्कार मिळाला. याच्या अंतर्गत सन्मानपत्र, एक लाख रुपये, पदक व स्मृतिचिन्ह त्याला प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल देवेशचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.