जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारकडून जल संवर्धनाची मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी जलशक्ती अभियान सुरू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रातर्फे जलशक्ती अभियानाची जनजागृती करण्यात येणार असून खा.उन्मेष पाटील यांच्याहस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रातर्फे जनजागृती करण्यात येणार आहे. सोमवारी खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते जलशक्ती अभियानाच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी, सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील, चेतन वाणी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी आदी उपस्थित होते.
खा.उन्मेष पाटील म्हणाले की, जल संवर्धन काळाची गरज असून प्रत्येकाने पाणी वाचविणे आवश्यक आहे. पावसाचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून तो कसा जतन करता येईल याकडे आपण लक्ष वेधावे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, लहान बंधारे, शेततळ्यात पाणी साठवले जाईल याची योग्य व्यवस्था प्रत्येकाने करायला हवे, असे मत त्यांनी मांडले. युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी यांनी जलशक्ती अभियानाच्या जनजागृतीविषयी माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात असलेल्या स्वयंसेवकांद्वारे भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्यात येणार असून प्रत्येकापर्यंत पाणी संवर्धनाचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.