नवी दिल्ली: वृत्तसंस्था । जागतिक पाणी दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती अभियानाची घोषणा केली.
जलशक्ती अभियानाची थीम ही कॅच द रेन असणार आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्यात करार झाला.
नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले जलशक्ती अभियान हे जनआंदोलन व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे अभियान 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. यामाध्यमातून पावसाद्वारे पडलेले जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे देशातील शहरी आणि ग्रामीण भागात राबवले जाईल.
केंद्र सरकारच्या वतीनं केंट बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या कराराला मान्यता देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेनुसार काम करणार असल्याचं सांगितलं. ज्यादा पाऊस असलेल्या क्षेत्रातून दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हा नदी जोड प्रकल्पाचा उद्देश होता.
बेटवा आणि केन या नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पांतर्गत डौधान धरण आणि कॅनलची निर्मिती करण्यात येईल. याप्रकल्पाअंतर्गत लोअर ओर प्रोजेक्ट, कोठा बॅरेज, बिना कॉम्प्लेक्स यासह विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल. केन बेटवा यांना जोडलं गेल्यानं दरवर्षी 10.62 लाख हेक्टरवरील क्षेत्र ओलिताखाली येईल. याप्रकल्पाचा फायदा 62 लाख लोकांना होणार आहे. या प्रकल्पाद्वारे 103 मेगावॅट वीज जलविद्युत प्रकल्पाद्वारे तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
केन बेटवा नदी जोड प्रकल्पाचा फायदा बुंदेलखंड, पन्ना , टिकमगढ, छत्तरपूर, सागर, दामोह, दातिया, विदीषा, शिवपूर या मध्यप्रदेशातील तर उत्तर प्रदेशातील बंड, महोबा, झांसी आणि ललितपूर या भागांना होणार आहे.