जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता

संतप्त नातेवाईकांचा आमरण उपोषणाचा मार्ग

शेअर करा !

पुणे वृत्तसंस्था । पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरमधून ३३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणी बेपत्ता झाल्यानं खळबळ माजली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणीला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरु असल्याचं कोव्हिड सेंटरमधून सांगण्यात आलं होतं. मात्र, बरी झालेल्या आपल्या तरुणीला जंबो कोव्हिड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या तिच्या आईला, ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.

जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय तरुणीचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता तरुणीच्या आईनं जंबो कोव्हिड सेंटर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून रुग्णवाहिकेतून कोव्हिड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यान उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया बेपत्ता तरुणीच्या आईनं व्यक्त केली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!