वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । चीनने त्यांच्या लष्करातील सैनिकांची जैविक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने काही चाचण्या केल्या आहेत. यातून, ‘सुपर सोल्जर’ तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा इशारा अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स’चे मावळते संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिला आहे.
रॅटक्लिफ यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये चीनकडून निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्याचे विश्लेषण केले आहे. चीनकडून अमेरिकेबरोबरच संपूर्ण जगाला मोठा धोका असल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे. त्याच लेखामध्ये चीनकडून ‘सुपर सोल्जर’ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचेही नमूद केले आहे.
रॅटक्लिफ यांनी या लेखात म्हटले आहे, की ‘चीनने त्यांच्या लष्करातील सैनिकांच्या मानवी चाचण्या केल्या आहेत. त्यातून सैनिकांची जैविक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये चीनच्या सत्तेकडून नैतिकतेचे कोणतेही बंधन पाळण्यात आलेले नाहीत. याबाबत अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांकडे पुरावे आहेत.’ रॅटक्लिफ यांनी या लेखामध्ये आणखीही चीनच्या कारवायांची माहिती नमूद केली आहे. एल्सा कानिया आणि विल्सन वॉर्नडीक यांनी गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या संशोधनामध्ये चीनकडून जनुकीय बदलांमध्ये रस वाढत असल्याचे म्हटले होते.
‘भविष्यातील युद्धांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे चीनच्या लष्करी संशोधकांकडून याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत,’ असे एल्सा कानिया यांनी म्हटले आहे. ‘सुपर सोल्जर’ची संकल्पना विज्ञानकथांमध्ये असलेल्या ‘सुपर सोल्जर’सारख्या संकल्पना प्रत्यक्षात विचारात घेतल्या आहेत. यामध्ये डीएनए किंवा जनुकीय रचनेमध्ये बदल करून मानवी क्षमता वाढू शकते, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘
आर्टिफिशियल इंटेलिजन्स’प्रमाणेच शरीराचे भाग, स्वतःहूनच वाढणारे अवयव यासारख्या गोष्टी भविष्यात अस्तित्वात असतील, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. मात्र, निसर्गाच्या विरोधात जाऊन मानवी शरीरामध्ये बदल करणे योग्य नाही, असे सांगून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ अशा संशोधनाला विरोध करतात.
जनुकीय बदलांतून सध्याच्या आव्हानांवर मात करण्याचे ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञान मानवी शरीराच्या क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे मानले जाते. या तंत्रातून जनुकीय त्रुटी दूर करणे, एखाद्या रोगाचा प्रसार रोखणे किंवा त्यावर उपाय करणे यासारख्या गोष्टींमध्येही त्यांचा उपयोग होऊ शकतो. मात्र, मानवी क्षमतांमध्ये बदल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जनुकीय बदलांना शास्त्रज्ञांचा विरोध आहे.
सैनिकांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही पहिली वेळ नाही. शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेच्या लष्कराकडूनही असामान्य सैनिक विकसित करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामध्ये दुखण्यावर मात करणे, टेलिपथी किंवा रोबोटिक्सचा विचार करून सैनिकांची परिणामकारकता वाढविण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता. अन्य देशांनीही अशा संशोधनांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही आणि शास्त्रज्ञांतूनही त्याला फारसा पाठिंबा मिळालेला नाही.