घरासमोरील दुचाकी चोरणारा पकडला

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात इसम पळवून नेत असताना त्याचा पाठलाग करून  त्याला गावकऱ्यांनी जेरबंद केल्याची घटना तालुक्यातील रामवाडी येथे घडली  आरोपीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तात्या कौतीक पाटील (वय-३२ रा. रामवाडी ता. चाळीसगाव) हे  परिवारासह वास्तव्यास आहेत. शेतीकामासाठी त्यांनी  बॉक्सर कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच.१९एन.५७८३) विकत घेतली होती. ४ मेरोजी दुपारी मोटारसायकल घरासमोर लावलेली असताना. अज्ञात इसम घरासमोर येऊन मोटारसायकल पळवून नेत असताना तात्या पाटील यांनी आरडाओरडा केली. तेवढ्यात तात्या पाटील यांचा मोठा भाऊ पंकज पाटील, शरद गायकवाड व संदीप मोरे यांनी पाठलाग  केला . पुढे जाऊन चोरट्यांचा गाडीवरचा तोल गेला आणि तो खाली पडला. लागलीच  या  व्यक्तींनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलिसांना याबाबत कळविले.  आरोपीला पोलीसांनी त्याचे नाव विचारले असता जुबेरखान हमीदखान (वय-२० रा. आयशानगर ता. मालेगाव) असे  सांगितले.   आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तात्या पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पो  नि  विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास हवालदार संदीप हे करीत आहेत.

Protected Content