घरावर दगडफेक करत तलवार अन चॉपरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हळदीच्या कार्यक्रमात पुतण्यामुळे वाद झाल्याचा राग मनात ठेवून १५ ते २० जणांनी जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील काकाच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून तलवार व चॉपरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २० जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे पंडीत शेनफडू कोळी वय ४३ हे वास्तव्यास आहेत. पंडीत कोळी यांचा पुतण्या गणेश कोळी याच्यामुळे ८ मे रोजी हळदीच्‍या कार्यक्रमात वाद झाल्याचा गैरसमज तसेच राग मनात ठेवून ९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जैनाबाद येथील पंधरा नावाच्या गृपचे धिरज कोळी, छोटू कोळी, अतुल पाटील यांच्यासह १५ ते २० जण पंडीत कोळी यांच्या घरी आले, त्यांनी पंडीत कोळी यांच्या घरावर दगडफेक केली, तसेच घरात घुसून तलवार व चॉपरचा धाक दाखवून शिवीगाळ करत तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी पंडीत कोळी यांना दिली, याचदरम्यान संबंधितांनी पंडीत कोळी यांचा पुतण्या गणेश कोळी यास फोनवरुन गावात येवून मारण्याची धमकी सुध्दा दिली. याबाबत दुसऱ्या दिवशी बुधवारी पंडीत कोळी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन धिरज कोळी, छोटू कोळी, अतुल पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अनिस शेख हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content