गोपनीय बैठकीत गिरीशभाऊंच्या भाजप नगरसेवकांना कानपिचक्या

0
3

जळगाव प्रतिनिधी । वॉटरग्रेस कंपनीवरून शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजी आणि यावरून भाजपच्या नेत्यांबाबत निर्माण झालेल्या संशयकल्लोळाच्या पार्श्‍वभूमिवर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीच्या बैठकीत नगरसेवकांना कानपिचक्या देत त्यांना कोरोनाच्या प्रतिकारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

जळगाव महापालिकेतील सत्ताधार्‍यांबाबत प्रचंड जनक्षोभ उसळला असतांना यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विरोधकही आक्रमक झालेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर शुक्रवारी संध्याकाळी भाजपची बालाणी लॉन येथे बैठक झाली. या बैठकीला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे बैठक झाल्यानंतर याबाबत पत्रकारांना माहितीदेखील देण्यात आलेली नाही. तथापि, एका वरिष्ठ नगरसेवकाने या बैठकीत फक्त कोरोनाच्या प्रतिकाराबाबत उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा गिरीश महाजन यांनी व्यक्त केल्याचे सांगितले. जळगावकरांनी आपल्या हाती सत्ता दिली आहे. त्याचा उपयोग करून चांगले निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. कोणीही कुणालाही पाठीशी घालत नाही; परंतु पक्षाची प्रतिमा मलिन होत असेल तर कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. शहरातील साफसफाईचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वॉटर ग्रेस कंपनी करारनाम्यानुसार काम करीत नसेल तर तातडीने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती या नगरसेवकाने दिली. तसेच कोरोनाच्या प्रतिकारासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.

दरम्यान, या बैठकीत काही नगरसेवक ही अंतर्गत माहिती प्रसारमाध्यमांना देत असल्याच्या कारणावरून गिरीशभाऊंनी त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्याचेही समजते. या बैठकीला माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, गटनेते भगत बालाणी उपस्थित होते. बैठकीत शहरातील अस्वच्छता व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या दोन विषयांवर चर्चा झाली.