गिरीशभाऊ आतातरी कोविड रुग्णांबद्दल स्टंटबाजी थांबवा — संजय गरुड

 

शेंदुर्णी ( ता – जामनेर ) : प्रतिनिधी । जामनेर मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबई,  नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचा आव आणत  पेशंटच्या नातेवाइकांसमोरची  स्टंटबाजी करणे आतातरी सोडा असा खोचक टोला पुन्हा राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी आज आमदार गिरीश महाजनांना लावला आहे .

 

संजय गरुड पुढे म्हणाले की , महाजन साहेब , आपण दवाखान्यात स्टंटबाजी करत असताना कार्यकर्ते व रुग्णालयाची यंत्रणा सोबत घेऊन फिरता. प्रोटोकॉल मुळे यंत्रणा वेठीस धरली जाते. त्यामुळे तेवढ्या वेळेत रुग्णांकडे दुर्लक्ष होते. सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजवून, मोठा ताफा सोबत घेऊन हॉस्पिटलमधील आपली स्टंटबाजी सामान्य व सुज्ञ महिलेलासुद्धा कळते. त्या महिलेने फार योग्य सल्ला दिलेला आहे. मी त्या भगिनीचे स्वागत करतो. तिने सुनावलेले खडेबोल एक सुज्ञ आमदार म्हणून आचरणात आणावे व महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचे राजकारण न करता रुग्ण सेवा करावी.

 

बाहेरील दौऱ्यांवर आमदार निधी खर्च करण्यापेक्षा जामनेर तालुक्यातील आरोग्य सेवेवर आपला आमदार निधी खर्च करून मतदारसंघातच रुग्णसेवा करा.

आता तरी या महिलेने दिलेल्या प्रसादाचा आपणास जामनेर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी सद़्सदविवेकबुध्दी मिळण्याचा लाभ मिळो ही तालुक्याची अपेक्षा  आहे  असेही संजय गरूड म्हणाले .

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.