गतिमंद तरुणीवर बलात्कार

गर्भधारणेनंतर गुन्हा उजेडात

मुंबई : वृत्तसंस्था । एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना वसईत घडली. ओळख वाढवून वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडित मुलीने केली. वसई पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

वसई पश्चिम, देवतलाव येथील लाकडाच्या वखारीमधे मजुरी करून तेथील एका खोलीत काही वर्षांपासून मुकेश (२५ ) नावाचा तरुण वास्तव्यास होता. मुकेश मूळचा उत्तर प्रदेश येथील असून त्याची वसईतील एका २२ वर्षीय गतिमंद मुलीशी ओळख झाली होती. तिचा मोबाइल क्रमांक त्याने घेतला. त्याद्वारे तिच्याशी ओळख वाढवून त्याने जवळीक वाढवली. जबरदस्तीने तीन वेळा शारीरिक संबंध ठेवले.

अचानक मुलीच्या पोटात दुखल्यानंतर वैद्यकीय चाचणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. वसई पोलिस ठाण्यात मुकेशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुकेशला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.