खुशाल दावा करा ! : पडळकरांनी स्वीकारले आव्हान

मुंबई प्रतिनिधी  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ५० कोटी रूपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिल्यानंतर पडळकरांनी या आव्हानाला स्वीकारून तुम्ही खुशाल दावा दाखल करा असे विधान केले आहे.

 

 

याबाबत वृत्त असे की, पडळकरांनी वडेट्टीवारांवर घणाघाती आरोप केले होते. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहेत. तसेच दारुच्या व्यवसायात त्यांची भागिदारी आहे, असे आरोप पडळकर यांनी केले होते. त्यामुळे वडेट्टीवार प्रचंड संतापले होते.  पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खर्‍या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिले होते. तसेच पडळकर यांच्यावर आपण ५० कोटी रूपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता.

 

 

यावर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र, असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर खुशाल ५० कोटींचा दावा करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.   महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर ५० कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे, असे खुले आवाहन पडळकर यांनी वडेट्टीवार यांना दिलं आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!