खासगी शाळेचा मनमानी कारभार ; महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अन्नत्याग साखळी उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील खासगी शाळेच्या मनमानी कारभार सुरू असून शाळेची फी न दिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचीत रहावे लागत आहे. विरोधात आज महाराष्ट्र स्टुंडंट युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवारी २३ जुलै रोजीपासून अन्नत्या साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या वतीने खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती फी वसूल होत असल्याबाबतची तक्रार व निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांना दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने कोणतेही उत्तर अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्यामुळे किंवा अद्यापपर्यंत कोणतीच ठोस कारवाई जिल्हा प्रशासन किंवा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेले नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आज शुक्रवार 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे सदस्य व पदाधिकारी यांनी अन्नत्याग साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा काढून शाळेची फी भरण्यास तयार आहे. परंतु कोरोनाच्या काळातील परिस्थितीत खाजगी शाळांची मनमानी थांबवण्यासाठी आपण ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती की, खाजगी शाळांनी फक्त शिकवणी शुल्क आकारून पालकांना फी भरण्यासाठी सुलभ हप्ते प्रदान करून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची गळचेपी थांबवावी. परंतु प्रशासनाकडून कोणताच निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव आज विद्यार्थ्यांचे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या निवेदनावर ॲड. अभिजीत रंधे, निलेश जाधव, सचिन बिराडे, चेतन चौधरी, निखील बिरारी, संदीप कोळी, अतुल बनसोडे, दीपक सपकाळे, आकाश धनगर, दिनेश जाधव, नारायण सपकाळे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!