कोरोना रुग्णाचा रुग्णालयातही सी ए परीक्षेचा अभ्यास !

 

भुवनेश्वर : वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे लोकं दहशतीत आहेत, या संकटाच्या परिस्थितीतही काहीजण  कठोर परिश्रम घेत आहेत. अशाच एका रूग्णाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो रुग्णालयातच सी ए परीक्षेची तयारी करत आहे.

 

ओडिशाच्या गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी या तरुणाचा फोटो शेअर केला आहे. मास्क घालून हॉस्पिटलच्या बेडवरच पुस्तक आणि कॅलक्युलेटर वगैरे ठेवून तो अभ्यास करत  आहे . विजय कुलांगे यांनी एमकेसीजी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा  दौरा केला, त्यावेळी त्यांनी  ट्विटरवर हा फोटो शेअर करत रुग्णाचं कौतुक केलं. “यश योगायोगाने मिळत नाही, त्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते” अशा आशयाचा संदेशही त्यांनी या फोटोसोबत लिहिला. “मी कोविड रुग्णालयाचा दौरा केला आणि या तरुणाला सीए परीक्षेची (चार्टर्ड अकाउंटंट्स) तयारी करताना बघितलं.  एखाद्या गोष्टीसाठी तुमचं समर्पण असेल तर दुःख विसरायला मदत होते…त्यानंतर यश केवळ औपचारिकता म्हणून उरतं….”, असा संदेश कुलांगे यांनी दिला.

 

कुलांगे यांनी या तरुणाचा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला   नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेकजण तरुणाच्या जिद्दीचं कौतुक करत असून भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.  स्वतःला करोनाची लागण झालेली असतानाही परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणाची जिद्द आणि चिकाटी पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.