कोरोना योद्धे शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी करणार आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी ।  कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी मंगळवार १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योद्धे धरणे आंदोलन करणार आहेत. याबाबतचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

कोरोना महामारीत संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबाॅय, डाटाएन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक इत्यादी कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्णय कोरोना योद्धयांच्या अजिंठा शासकीय विश्रामगृह, येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळात आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी जिवाच्या भीतीने घरी बसले असताना कोरोना रुग्णांच्या सेवा शुश्रुषा करणारे शासकीय रुग्णालयातील कंत्राटी  पद्धतीने काम करणाऱ्या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाला घेण्यास भाग पाडू. संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी न्याय हक्कासाठी कोरोना योद्धयांनी संघटीतपणे आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली असून आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने या पदावर कोरोना योद्धयांना सामावून घेतले पाहिजे.यासाठी शासनावर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकावा लागेल असे स्पष्ट केले. छावा मराठा युवा महासंघाचे  जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, इंजि.एच. एच. चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष निलेश बोरा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चंदन बिऱ्हाडे, भारत सोनवणे, सुधाकर पाटील, सतीश सुर्वे यांच्यासह कोमल बिऱ्हाडे, प्रिया वाघ, अक्षय जगताप, बापूसाहेब पाटील, कुवरसिंग पावरा, युवराज सुरवाडे, भाग्यश्री चौधरी, प्रतीक्षा सोनवणे, शिला सपकाळे, दिपाली भालेराव,‌ ऐश्र्वर्या सपकाळे, मंदाकिनी विंचूरकर, मो.आमिर शेख, निशा तापकिरे, जयवंत मराठे, जितेंद्र चौधरी,कृष्णा सावळे,सुनील परदेशी, डॉ.प्रसन्न पाटील, गणेश सोनवणे, नदीम बेग दानिश बागवान, पवन पाटील, मनोज सावकारे, चंद्रशेखर पाटील, समाधान शिंगटे, प्रशांत नेवे, किशोर भोई यांच्यासह जिल्हाभरातील कोरोना योद्धे बैठकीला उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!