कोरोनामुळे अनाथ झालेल्या १० मुलींच्या लग्नासाठी दातृत्वाचा पुढाकार !

जळगाव, प्रतिनिधी । भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सतर्फे कोरोनामुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील १० मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. 

आज संसारोपयोगी वस्तू व ३० हजार रुपये पर्यंतची मदत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते देण्यात आली. 

शिरसोली येथील दशरथ बुधा भिल (वय 48) यांचे कोरोनाने एप्रिल महिन्यात निधन झाले. या कुटुंबावर आलेल्या आर्थिक सन्कटामुळे ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन भिल कुटुंबातील शुभांगी भिल या तरुणीचा विवाह १६ जून रोजी पाचोरा येथे पार पडणार आहे. भरारी फाऊंडेशन व के.के.कँन्सच्या  सहकार्याने नववधूला  शुभमुहूर्तावर आज सोन्याचे मंगळसूत्र, दागिने, साड्या, संसाराला आवश्यक वस्तू, भांडे आणि रोख मदत व सर्व वस्तू मिळून ३० हजारपर्यंत मदत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते देण्यात आली. 

पद्मावती मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, डॉ.स्वप्नील चौधरी, अमित भाटिया, विनोद ढगे, अमर कुकरेजा, रविंद्र लढ्ढा, बाळासाहेब सूर्यवंशी, रितेश लिमडा, निलेश जैन, दीपक विधाते, सचिन महाजन, निलेश झोपे विक्रांत चौधरी  आदी उपस्थित होते.

कोरोना काळात अनाथ झालेल्या १० तरुणींच्या लग्नाची आणि 2५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सने स्विकारली आहे. के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी यांनी तरुणीला विवाहप्रित्यर्थ सोन्याचे मंगळसूत्र, संपूर्ण भांड्यांचा सेट, कुकर, इतर संसारोपयोगी साहित्य, दागदागिने, साड्या आणि रोख रक्कम भेट दिली आहे.

 कोरोना काळात  काहींनी आपले मातृछत्र व पितृछत्र गमावले आहे. पोरके झालेल्या हा घटकापर्यंत पोहचणे आवश्यक असून त्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सकडून हे कार्य  निस्वार्थ भावनेने पार पाडले जात असून भविष्यात देखील ते याच मार्गाने कार्यरत राहतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.