कोरोनाचा धोका मुलांना नाही – गुलेरिया

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या पुढील लाटेत मुलं संक्रमित होतील अशी माहिती भारतासह जगात कुठेही उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे.

 

त्यांनी कोरोना लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं.

 

“देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कोणताही डेटा उपलब्ध नाही ज्यामध्ये कोरोना लाटेत मुलं गंभीर संक्रमित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती रणदीप गुलेरिया यांनी दिली.

 

“देशात  दुसऱ्या लाटेत संक्रमित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ६० ते ७० टक्के मुलांना इतर आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती होती. गंभीर लक्षणं नसणार निरोगी मुलं रुग्णालयात दाखल न होताही बरी झाली आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

 

“लोकसंख्या जास्त असली की एकाहून जास्त लाटा येत असतात. लोकसंख्येचा एक मोठा भाग संसर्गाविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती प्राप्त करतो, तेव्हा संसर्गावर नियंत्रण येतं आणि संसर्ग हंगामी होतो. स्वाईन फ्ल्यूप्रमाणे जो सामान्यत: पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये पसरतो. विषाणूंमध्ये बदल होत असल्याने लाटा येत असतात. नवीन उत्परिवर्तन जास्त संसर्गजन्य झाल्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

 

यावेळी त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे असं सांगितलं. “रुग्णसंख्येत वाढ झाली की लोकांमध्ये भीती निर्माण होते आणि त्यांच्या वागणुकीतही बदल होतो. ते नियमांचं काटेकोरपणे पालन करतात आणि कोणत्याही औषधांविना साखळी तोडण्यास मदत मिळते. पण जेव्हा अनलॉक होतं तेव्हा लोकांना आता संसर्ग होणार नाही असं वाटतं आणि नियमांकडे दुर्लक्ष केलं जातं. यामुळे पुन्हा एकदा संसर्गाचा फैलाव होतो आणि याचं रुपांतर लाटेत होतं,” असं त्यांनी सांगितलं आहे.

 

“जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झाल्यास किंवा लोकांमध्ये संसर्गाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यास या लाटा रोखल्या जाऊ शकतात. मात्र सध्या नियमांचं कडक पालन करणं महत्वाचा मार्ग आहे,” असं ते म्हणाले

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.