केंद्रीय मंत्रिमंडळातील ४२ टक्के मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील ४२ टक्के म्हणजे ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले सुरू आहेत. तर २४ मंत्र्यांवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या गंभीर गुह्यांची नोंद असल्याची माहिती नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या अहवालातून समोर आली आहे.

अलीकडेच केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. विस्तारानंतर मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ७८वर पोहचली आहे. यातील बहुतांश मंत्र्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल असून काही जणांच्या विरोधात तर खटले सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न, दरोडा, महिला अत्याचार, भ्रष्टाचार तसेच पाच वर्षांहून अधिक शिक्षा होणाऱया गंभीर गुह्यांचा समावेश आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे मंत्र्यांवरील गुन्हे, संपत्ती, शिक्षण यासंदर्भातील अहवाल तयार केला आहे.

अलीकडच्या फेरबदलात निशिथ प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र त्यांच्या विरोधातच भादंविच्या कलम ३०२नुसार हत्येचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही. मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

मोदी मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांवर सामाजिक व धार्मिक वाद निर्माण करणे, भाषेच्या आधारावर सामाजिक तेढ निर्माण करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गिरिराज सिंह, नित्यांद राय, प्रल्हाद जोशी यांचा समावेश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील ८२ टक्के म्हणजेच ६४ मंत्री हे सुशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तर १२ मंत्र्यांचे शिक्षण ८वी ते १२वीदरम्यान झालेले आहे. दोन मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे. १७ मंत्री पदवी, २१ मंत्री पदव्युत्तर तर ९ मंत्र्यांकडे डॉक्टरेट आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!