काँग्रेसचे चार खासदार निलंबीत

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महागाईच्या विरोधात लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कॉंग्रेसच्या चार खासदारांना निलंबीत करण्यात आले आहे.

काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे लोकसभेचे कामकाज 26 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

नियम 374 अन्वये काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी, विरोधी खासदारांनी सोमवारी सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ या मुद्द्यांवर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. ओम बिर्ला म्हणाले, “हे लोकशाहीचे मंदिर आहे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे.”

खासदारांच्या निलंबनाबाबत काँग्रेसकडूनही निवेदन देण्यात आले. आमच्या खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ते लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होते असे मत काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.