मुंबई : वृत्तसंस्था । अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेलसह ४ आरोपींवर मुंबई पोलिसांनी विश्वासघात , फसवणूक आणि कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खास पोलिसांनी गुन्हा दाखल केला
. कंगना आणि रंगोलीसोबतच कुमार जैन आणि अक्षय रणौत या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. खार पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. काही दिवसांमध्ये तपासासाठी कंगनाला पोलीस स्थानकामध्ये बोलावण्यात येणार असल्याचेही समजते.
दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशीष कौल यांनी आपली कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती. त्यानंतर याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली. मात्र ही घोषणा करण्याआधी कंगाने या कथेचे मूळ लेखक असणाऱ्या कौल यांची परवानगी घेतली नव्हती.
कंगनाने जानेवारी महिन्यात या चित्रपटासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानंतर कौल यांनी वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यांनी कंगनाबरोबरच तिची बहीण रंगोली, कमल कुमार जैन आणि अक्षय रणौत या तिघांच्या नावांचाही उल्लेख आहे. न्यायालयाने सर्व गोष्टीची पडताळणी करुन मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी ४०६,४१५,४१८,३४,१२०(ब) आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत ५१,६३ आणि ६६ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.लवकरच चौघांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात येईल.
मुंबईमधील वांद्रे पोलीस स्थानकामध्ये कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात सोशल नेटवर्किंगवरुन समाजामध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातही वांद्रे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला होता.