ओरिसातील बलात्काराचा आरोपी २२ वर्षांनी लोणावळ्यात पकडला !

शेअर करा !

 

पुणे : वृत्तसंस्था । बलात्कार गुन्ह्यातील ओरिसातील  मुख्य आरोपीला २२ वर्षांनी महाराष्ट्रातून अटक आली आहे. या बलात्कारामुळे ओडिशा सरकार हादरलं होतं. १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे बी पटनाईक यांना राजीनामा द्यावा लागला होता.

 

ओडिशा पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. पीडित महिला भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याची पत्नी होती.  ती  मित्रासोबत कट्टक येथून भुवनेश्वरला प्रवास करत असताना ९ जानेवारी १९९९ रोजी तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. पीडित महिलेने पटनाईक आणि माजी महाधिवक्ता इंद्रजित रे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी या  गुन्ह्यात  महत्वाची भूमिका निभावल्याचा दावा केला होता. हे आरोप एफआयआरमध्ये नोंद करण्यात आलेले नाहीत.

 

घटनेच्या ७० दिवसांनी प्रदीप साहू आणि दिरेंद्र या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी बिबेकनंदा बिस्वाल मात्र तब्बल दोन दशकं फरार होता. सोमवारी ओडिशा पोलिसांच्या दोन टीमकडून बिस्वालला लोणावळा येथून अटक करण्यात आली. तिथे तो प्लंबर म्हणून काम करत होता.

 

“आरोपीची माहिती मिळवण्यासाठी आणि अटकेच्या कारवाईसाठी आम्ही ऑपरेशन सायलेंट वायपर लाँच केलं होतं. त्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आमच्या टीम सक्रीय झाल्या. एका रिसॉर्टमध्ये आपली ओळख लपवून तो काम करत होता,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

२००२ मध्ये बलात्कारातील इतर दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात यामधील एकाचा मृत्यू झाला. तपासात कोणतीही प्रगती नसल्याने ओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने तपास हाती घेतला होता. तीन महिन्यांपूर्वी भुवनेश्वर पोलीस आयुक्त सुधांशू सारंगी यांनी पुन्हा तपास सुरु केला.

 

“काही आरोपींना भेटल्यानंतर मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याचं समोर आलं.  अभ्यास करत आरोपीला अटक करण्यासाठी ऑपरेशन लाँच केलं. त्यानंतर आरोपी महाराष्ट्रात असल्याची माहिती आम्हाला मिळाली,” असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं

 

“आरोपीने आधार कार्डही मिळवलं होतं, एका बँकेत खातंही उघडलं होतं. आरोपी कुटुंबाच्या संपर्कात होता असं आम्हाला कळालं आहे.  खटला कायमचा बंद करण्यासाठी कुटुंबाने त्याचा मृत्यूदाखला मिळवण्याचा प्रयत्न केला होता,”  अशी  माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

 

अटकेवर बोलताना पीडितेने पोलिसांनी आभार मानत म्हटलं आहे की, “इतकी वर्ष मला आपण आतून मृत असल्यासारखंच वाटत होतं. आपला आरोपी मोकाट फिरतोय रोज हा विचार येत असे. इतकी वर्ष न्याय मिळाला नाही. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी”.

 

घटनेच्या दोन वर्ष आधी १२ जुलै १९९७ रोजी पीडितेने माजी महाधिवक्ता इंद्रजित रे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. महिलेने १९ जुलैला पोलीस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रारही दिली होती. यावेळी महिलेने मुख्यमंत्री पटनाईक इंद्रजित रे यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपदेखील केला होता. इंद्रजित रे यांनी १९९८ मध्ये राजीनामा दिल्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केलं.

 

पीडितेने आपल्याला घाबरवण्यासाठी आणि इंद्रजित रे यांच्याविरोधातील आरोप मागे घेण्यासाठीच सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. फेब्रुवारी २००० मध्ये सीबीआय कोर्टाने इंद्रजित रे यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!