जळगाव प्रतिनिधी । एटीएमकार्ड बंद पडल्याची बतावणी करून ते सुरू करण्यासाठी एटीएम कार्डची माहिती घेवून एकाची १ लाख १९ हजार ३५७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चार भामट्यांना अटक करण्यात सायबर विभागाला यश आले आहे. चौघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, २३ जुलै २०१९ ते २६ जुलै २०१९ दरम्यान तक्रारदार यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर संपर्क करून एसबीआय क्रेडीटकार्ड डिपार्टमेंट येथून बोलत असल्याचे बतावणी करून तक्रारदार यांच्याकडून एटीएम कार्डवरील १६ आकडी नंबर विचारून घेत मोबाईलवर आलेले ओटीपी क्रमांक विचारून त्यांच्या खात्यातून ८९ हजार ४८८ रूपये www.mi.com या खात्या वळविले. तर ॲक्सीस बँक क्रेडीट कार्डचा सोळा आकडी नंबर आणि ओटीपी नंबर विचारून त्यातून २९ हजार ८६९ रूपये paytm खात्यात वळविले. असे एकुन १ लाख १९ हजार ३५७ रूपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी सायबर विभागात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर विभागाने गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी नवी दिल्ली येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी ०३ फेब्रुवारी २०२० रोजी सफौ मनोहर देशमुख, पोहेकॉ वसंत बेलदार, पोकॉ नितीन भालेराव, पोकॉ दिपक सोनवणे, पोकॉ ललीत नारखेडे यांना नवी दिल्ली येथे पथक रवाना केले. दोन दिवसानंतर फैज आलम रमातुल्ल (वय-२८) रा. हाऊस नं.१८, मोहन गार्डन उत्तम नगर, नवी दिल्ली, अदित्य ब्रिजभुषण गर्ग (वय-२१) रा. प्रताम गार्डन, उत्तम नगर, नवी दिल्ली, शेषनाथ जयप्रकाश गुप्ता (वय-४०) रा. डिफेन्स एन्क्लेव मोहन गार्डन, नवी दिल्ली व अन्य एकजण यांना अटक केली. चौघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.