ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही; अलाहाबाद हायकोर्टाने फटकारलं

 

प्रयागराज : वृत्तसंस्था  । ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी असणाऱ्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं आहे. रुग्णालयात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होणं गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सुनावलं आहे.

 

न्या  सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. लखनऊ आणि मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या  रुग्णांच्या मृत्यूसंबंधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टची दखल घेताना खंडपीठाने हा निष्कर्ष नोंदवला.

 

“ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने  रुग्णांचा मृत्यू होणं आमच्यासाठी वेदनादायी आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची खरेदी आणि पुरवठा साखळी सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्यांकडून करण्यात आलेलं हे गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही,” अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.

 

“विज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, ह्रदय प्रत्यारोपण आणि ब्रेन सर्जरी होत आहेत. अशा परिस्थितीतही आम्ही लोकांना मरण्यासाठी कसं काय सोडू शकतो,” अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली. न्यायालयाने यावेळी लखनऊ आणि मेरठचे जिल्हा दंडाधिकारी यांना  चौकशी करत ४८ तासांत रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणीदरम्यान हजर राहण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

 

“सामान्य स्थितीत आम्ही राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासनाला सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या वृत्तासंबंधी चौकशी करण्यास सांगितलं असतं. मात्र या याचिकेत सहभागी वकिलांनी वृत्ताचं समर्थन केलं असून राज्यात किंवा जिल्ह्यांमधील अशा घटनांची माहिती दिली आहे. त्यामुळेच आम्हाला सरकारने त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत,” असं न्यायालयाने म्हटलं आहे.

 

मेरठमध्ये रविवारी पाच रुग्णांचा मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. याशिवाय लखनऊनमधील सन हॉस्पिटल आणि मेरठमधील एक खासगी रुग्णालय रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करु शकलं नाही. वारंवार प्रशासनाकडे मागणी करुनही ऑक्सिजन पुरवठा झाला नसल्याचा आरोप आहे.

Protected Content