‘एम्स’च्या अहवालामुळं आम्हाला सगळ्यांनाच न्याय मिळाला : परमबीर सिंह

 

मुंबई, वृत्तसंस्था । सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता हे सिद्ध झालंय, ‘एम्स’च्या अहवालामुळं आम्हाला सगळ्यांनाच न्याय मिळाला अशी भावना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ‘एम्स’च्या अहवाल आल्यानंतर व्यक्त केली आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर देशभरात संशयकल्लोळ माजला होता. सुशांतची आत्महत्या नसून खून आहे. मुंबई पोलीस योग्य पद्धतीनं तपास करत नसल्याचा आरोप भाजपसह बॉलिवूडमधील काही मंडळींनी केला होता. अखेर हे प्रकरण सीबीआयकडे गेले होते. सुशांतचा मृत्यू हा खून आहे की आत्महत्या याचा तपास करण्यासाठी सीबीआयनं एम्सची समिती स्थापन केली होती. या समितीनं अहवाल दिला असून सुशांतनं आत्महत्याच केल्याचं ‘एम्स’नं स्पष्ट केलं आहे.

‘एम्स’च्या अहवालानंतर परमबीर सिंह यांनी पीटीआयशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली आहे. ‘तपासाविषयी कुठलीही माहिती नसतांना काही लोकांनी स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं होतं. खरंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत प्रोफेशनल पद्धतीनं केला होता. कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सुशांतचं पोस्टमॉर्टेम व्यवस्थित केलं होतं. ‘एम्स’च्या अहवालामुळं आम्हाला सगळ्यांनाच न्याय मिळाला,’ असं परमबीर सिंह म्हणाले. सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल परमबीर सिंह म्हणाले,

‘सर्वोच्च न्यायालयानं बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे हा तपास सीबीआयकडे दिला होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीशी या निर्णयाचा संबंध नव्हता. मुंबई पोलिसांच्या तपासात न्यायालयाला कुठलीही त्रुटी आढळली नव्हती.’

‘मुंबई पोलिसांनी आपला चौकशी अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला होता. त्याबद्दल केवळ सहा जणांना माहिती होती. त्यात तपास अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, राज्याचे महाधिवक्ता व न्यायाधीश यांचा समावेश होता. इतर कुणीही हा अहवाल पाहिला नव्हता किंवा कोणाला अहवालात काय आहे याची अजिबात माहिती नव्हती. असं असतानाही काही लोकांनी विनाकारण मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका केली,’ असं परमबीर सिंह म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.