एक लाखाचे बनावट कापूस बियाणे जप्त

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वड्री गावात बोगस कापूस बियाण्याचे पाकीट आढळून आल्याने गडबड उडाली आहे ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

चोपडा तालुक्यातील वड्री येथे मिळालेल्या माहितीनुसार 23 मे रोजी मे. अंकुर सिडस, नागपुर या कंपनीचे स्वदेशी 5 या वाणाचे बनावट बियाणे विक्री करणाऱ्या संदीप आधार पाटील, वड्री, ता. चोपडा यांचेकडून चोपडा शहराचे बाहेर मे. अग्रवाल पेट्रोल पंपाचे बाजूस असलेल्या हॉटेल न्यू सुनिता येथून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी सापळा रचुन स्वदेशी 5 वाणाचे एकूण 99 हजार 750 रुपये किमतीचे 95 पाकिटे बनावट कापूस बियाणे जप्त केले आहे. ही कारवाई विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

याबाबत श्री. संदीप आधार पाटील, रा. वड्री, ता. चोपडा यांचे विरुध्द शासनातर्फे बियाणे नियम 1968, बियाणे (नियंत्रण) आदेश 1983. महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच भा.द.वि. 1860 चे कलम 420, 465, 468 नुसार चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे क्र. 252/2023, दिनांक 24 मे, 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करू नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगांव यांचे मोबाईल क्र. 8983839468 व दुरध्वनी क्र.0257-2239054  वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content