मुक्ताईनगर (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख या पदाधिकाऱयांची महत्वपूर्ण बैठक आज दुपारी १२.०० वाजता येथे संपन्न झाली. ही बैठक संपल्यानंतर लागलीच पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्र परिषदेत जिल्हाप्रमुख व सर्व पदाधिकार्यानी युतीबाबत जोपर्यंत पक्षाने नेमलेले अधिकृत समन्वयक माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे व उमेदवार रक्षा खडसे प्रत्यक्ष येऊन चर्चा करीत नाहीत तोपर्यंत शिवसेना तटस्थ असणार असल्याचा निर्धार जाहीर केला.तसेच या इशाऱ्यानंतरही समोरील उमेदवार दुर्लक्ष करीत असल्यास कोणाला मदत करायची ते ऐनवेळी ठरवले जाईल, अशी कणखर भूमिका सर्वच पदाधिकार्यानी यावेळी बोलून दाखवली.
दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे भाजपने पेजप्रमुख मेळावा घेतला, यासाठी काही शिवसैनिक पळवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही त्यांच्या गळाला लागले नाही. मुळात हा कोणता युती धर्म भाजप पाळत आहे ? असा सवाल भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केला तर रावेर, यावल व चोपडा तसेच मलकापूर नांदुरा येथील तालुका प्रमुखांनी शिवसेनेच्या ग्रामपंचायतीला निधी देतांना केवळ शिवसेनेच्या ग्रामपंचायती म्हणून खासदार महोदय यांनी तेथे निधी दिलाच नाही, अशी खंत व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी उमेदवार आ. खडसे यांनी सर्व शिवसेना सोबत असल्याचा बनाव केला होता तर त्यांनी सोबत असलेल्यांची नावे जाहीर करावी, असे आव्हान भुसावळ शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी दिले.
उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, शिवसेना युतीचे काम तेव्हाच करेल जेव्हा पक्षांने नेमलेले अधिकृत समन्वयक व माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि उमेदवार रक्षाताई खडसे जोपर्यंत शिवसेना पदाधिकारी यांच्याशी चर्चा करीत नाहीत तोपर्यंत शिवसेना प्रचारात उतरणार नाही.
तसेच राष्ट्रवादीत जाणार का ? या प्रश्नाला उत्तर ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होतो व आहोत आणि राहू, भगव्याशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे हे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न असून शिवसैनिकांत फूट टाकण्याचा कुटील डाव आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख जामनेर मनोहर पाटील , उपजिल्हाप्रमुख रावेर प्रल्हाद महाजन, उपजिल्हाप्रमुख चोपडा मुन्ना पाटील, उपजिल्हाप्रमुख यावल तुषार पाटील, उपजिल्हाप्रमुख बोदवड विनोदपाडर, चोपडा तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन, रावेर तालुका प्रमुख योगीराज पाटील, यावल तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, मलकापुर तालुका प्रमुख किशोर नवले, मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई, चोपडा शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन शहरप्रमुख निलेश महाजन, बबलू बऱ्हाटे, रावेर शहरप्रमुख नितिन महाजन, बोदवड शहरप्रमुख संजय महाजन, हर्षल बडगुजर, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अफसर खान, मनोहर खैरनार, मुक्ताईनगर शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेशजी टोंगे, फैजपूर शहरप्रमुख अमोल निंबाळे , उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी जामनेर भरत पवार आदी उपस्थित होते.