उद्धव ठाकरेंकडून थेट पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांसंबंधी अद्यापही निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी आज दिल्लीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज्याशी निगडीत एकूण १२ विषय नरेंद्र मोदींसमोर मांडले. यामधील एक विषय विधानपरिषदेतील १२ रिक्त जागांचा होता. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत चर्चेसंबंधी माहिती दिली.

 

पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सांगितलं की, “सरकार बहुमतात आहे. कॅबिनेटने ठराव  केला आणि राज्यपालांची भेटही घेतली. या १२ जागा जवळपास आठ महिन्यापासून रिक्त आहेत. नियमावलीत ज्याप्रमाणे व्यक्ती निवडताना अटी असतात त्या सर्वांचा त्यात समावेश आहे. तर तो मुद्दाही आम्हीही मोदींकडे मांडला. यावर त्यांनी जे काही करण्याची गरज आहे त्यासंबंधी निर्णय घेतो असं सांगितलं आहे”.

 

 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

 

उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नातं तुटलं असा नाही.   मुलाखतीतही हे सांगितलं होतं. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही. मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं असेल असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

 

 

“मधल्या काळात त्यांचा फोन आला आणि सरकार चांगलं काम करत आहे सांगितलं हे व्यक्तिगत बोलणच होतं. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असं सांगितलं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली ? असं विचारलं असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावं असं ते म्हणाले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.