लखनऊ : वृत्तसंस्था| उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं गुरुवारी राज्यातील १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला. यामध्ये हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लष्कर यांच्या नावाचाही समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यातील चर्चित सामूहिक बलात्कार आणि हत्या तसंच धक्कादायक पद्धतीनं मृतदेहावर अंत्यसंस्कार अशा घटना प्रवीण कुमार यांच्याच अखत्यारित येणाऱ्या भागात घडल्या होत्या.
हाथरस घटनेत सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या मृतदेहावर पीडित कुटुंबीयांच्या परवानगिशिवाय पोलिसांनीच रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार उरकले होते. कायदे-सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.
हाथरसमधून प्रवीण कुमार यांना आता मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलंय. तर ‘उत्तर प्रदेश जल निगम’ची जबाबदारी हाताळणारे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक रमेश रंजन यांना हाथरसचं जिल्हाधिकारीपद सोपवण्यात आलंय.
१४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर चार सवर्णांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. २९ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात या मुलीनं अंतिम श्वास घेतला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून घाई-गरबडीत ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री तिच्या मृतदेहाला आग लावण्यात आली होती. यासाठी कुटुंबीयांची परवानगी विचारात घेण्याची गरज पोलिसांना वाटली नव्हती, हे विशेष. तरुणीच्या कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे आरोप झाल्यानंतर हाथरसचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लष्कर चर्चेत आले होते.
उत्तर प्रदेश सरकारद्वारे निष्पक्ष चौकशीसाठी हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कोणतीही योग्य कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं याबद्दल नोव्हेंबर महिन्यात चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारकडून बदलीचे निर्देश देण्यात आलेत.