उच्च न्यायालयाकडून नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र रद्द ; खासदारकी धोक्यात?

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । उच्च न्यायालयाने खासदार नवनीत  राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं.  त्यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची चिन्हं आहेत.

 

 

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

 

 

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असं मत नोंदवून जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंड ठोटावला आहे.  खोटं जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

 

राणा यांनी जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाकडूनही मान्य करण्यात आली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता.  आज पुढील सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयानं राणा याचं जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राणा यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेलं प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं, तर संबंधित सदस्याचं पद रद्द होऊ शकतं. मात्र आता राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.