जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी प्रकरणात पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिसांना बडतर्फ तर भारत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना ही माहिती दिली. दरम्यान, पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचाही बडतर्फचा प्रस्ताव महासंचालकांकडे रवाना झाला आहे.
शहरातील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकानात छापा टाकून मद्यविक्रीचा डाव हाणून पाडला होता. याप्रकरणी प्राथमिक तपासात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर यात गुन्ह्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते. यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस नाईक जीवन पाटील, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे नाईक संजय जाधव, मुख्यालयातील पोलिस नाईक मनोज सुरवाडे व तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ भारत पाटील यांचा देखील बेकायदेशीर दारूविक्रीत सहभाग असल्याचे समोर आले होते. दरम्यान या गुन्ह्याची चौकशी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ आणि चारही पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रणजित शिरसाठ यांची पोलीस अधिक्षकांनी उचलबांगडी करत पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, आज पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिसांना बडतर्फ तर भारत पाटील यांना निलंबित करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचाही बडतर्फचा प्रस्ताव महासंचालकांकडे रवाना झाला आहे.