भंडारा : वृत्तसंस्था । भंडारा जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये दहा बालकांचा मृत्यू होणं हे लाजिरवाणं आहे , राज्याच्या इतिहासातील काळी घटना : असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे
भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक, प्रगतीशील महाराष्ट्रात १० नवजात बालकांचा मृत्यू आयसीयू मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस नागपुरातून भंडाऱ्याकडे निघाले आहेत. तिथे ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.
संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये घडली आहे. रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बाळांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी मध्यरात्री २च्या सुमारास ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाला.
राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या निष्कळजीपणामुळे याआधी सुद्धा अनेक लोकांचं मृत्यू रुग्णालयात झालेले आहेत. या १० बालकांचा मृत्यू झाला ही हत्या आहे. सरकार असा निष्कळजीपणा किती दिवस करणार आहे
भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे. असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात बालकांचा मृत्यू झालाय, याची सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश भंडारा पोलिसांना दिले आहेत. ते आज स्व:त घटनास्थळी भेट देणार आहे.
या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयांतील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्यात येईल असे पवार यांनी सांगितले आहे. तसेच अन्य बालकांवरील उपचार सर्व देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधीनी भंडारा येथील नवजात बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारला आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याची विनंती त्यांनी केली आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार घटनास्थळाला भेट देणार आहेत. ते भंडारा जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. बालक ठेवण्यात आले होते त्या वर्डात आग लागली. सबंध वॉर्डामध्ये धूर जमा झाला होता. सर्व बालकांना हलवण्यात यश आलं. यामुळे १० बालकांचा मृत्यू झाला.
भंडारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात जी दुर्घटना झाली. ती अतीशय दुखद असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाल आहेत. त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. ट्विट करुन त्यांनी कुंटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.