विकासाच्या नावाखाली सर्वत्र बेसुमार प्रमाणात वृक्षतोड सुरू असून याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही होत नाही. या अनुषंगाने केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मीनल कुष्टे यांनी लिहलेले हे जाहीर पत्र.
आदरणीय महोदय,
आज महाराष्ट्र दुष्काळच्या आगीत होरपळून निघतो आहे. पावसाची कमतरता तर आहेच, पण भूगर्भातले पाणीही आटत चालले आहे. हजार फुटापर्यंत बोअर मारली तरी पाणी लागत नाहीये. तीनशे फुटा खालचे पाणी तर पिण्या योग्य नसून ते शेकडो वर्षांपासून आत झिरपलेले पाणी होय. जे पृथ्वीच्या पोटातील तापमान नियंत्रित ठेवायला मदत करते. अशा ह्या संपत चाललेल्या पाण्याचा नुसता उपसा होतोय; त्याचे पुनर्भरण होत नाहीये. आणि होणार ही कसे व कोठून? ह्या साठी ज्या जंगलांची, मोठ्या वृक्षांची गरज लागते ते तुमच्या विकासाला नकोय आणि म्हणून तुमचा झाडे, जंगले नष्ट करण्याचा एक कलमी कार्यक्रम मोठ्या जोमात सुरु आहे.
सध्या सरासरी तपमानात खूप वाढ होते आहे. व त्याची असह्यता अनेक पटीने वाढली आहे. आर्द्रता कमी झाल्या मुळे हवा कोरडी होऊ लागली आहे. त्यामुळे अंगाची काहिली होते आहे होत आहे. या साठी कारणीभूत आहे, झाडांची अनिर्बंध तोड. झाडे काय करतात ते बघा: ती नुसती लाकडातून पैसे नाही मिळवून देत तर,
१. ती उन्हाची किरणे वरच्यावर अडवितात. सावली निर्माण करतात. किमान २ अंश सेल्सीयस इतके सावलीतले तापमान कमी असते.
२. हवेतील कर्ब वायू घेऊन तिथे पुन्हा प्राणवायू भरतात.
३. हवेतील आर्द्रता कायम राखण्यास मदत करतात.
४. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब झाडे स्वत: झेलतात. त्याचा प्रवेग कमी करतात व मग हळूच जमिनीवर सोडतात.
५. वृक्षांच्या मुळांमुळे जमिनीत पाणी झिरपते. ते आजूबाजूची माती धरून ठेवतात. डोंगर-दरीतले झाड पाऊस पडावा म्हणून आवश्यक ती वातावरण निर्मिती करतात. एकंदरीतच काय तर ही झाडे सजीवांना जगायला मदत करतात.
३३% जमीन वनांनी आच्छादित असावी म्हणजे संतुलन रहाते. जंगले ही संतुलित व संरक्षित जीवनाचा खरा आधार आहेत आणि जलाधारही आहेत. जंगल नसेल तर पाणी कस असेल? खारफुटीचा उपयोग समुद्र किनार्याची फक्त धूप थांबविण्यासाठी न होता ती त्सुनामीला ही थोपवून धरते. ह्या सर्वांचा नाश केला जातोय. मातीचा थर बनायला हजारो वर्षे लागतात. अशी मौल्यवान माती सांभाळली जात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या पावसाळ्यात सगळीकडच्या धबधब्यांचा रंग लालसर होता. झाडे नसल्यामुळे माती धुपून ती पाण्या बरोबर वहात होती. हे त्या रंगा वरून कळते. ह्या सर्व गोष्टींचा सजीवांच्या जीवनाशी संबंध आहे. ज्या गोष्टी जगायला मदत करतात त्यांना सांभाळणे म्हणजे विकास करणे असे असतांना ह्या सर्व गोष्टी संपवून टाकतो त्याला विकास कसे म्हणावे?
हे केल्यामुळे विकास होईल तो ऑटोमोबाईल कंपन्यांचा, ठेकेदारांचा व राजकारण्यांचा ! त्याच बरोबर कृत्रिमरीत्या प्राणवायू तयार करण्यार्या कंपन्यांचा, पाणी विकणार्या कंपन्यांचा, दारू विक्री करणार्यांचा वगैरे-वगैरे ! पण हा निसर्ग संपल्यामुळे जो हाहाकार माजेल त्याची झळ सगळ्यांनाच सोसावी लागेल. अगदी विविध कंपन्यांसह ठेकेदारांना व फक्त आर्थिक विकासाच्या मागे असणार्या राजकारण्यांना देखील!
झाडांच्या बरोबर तुम्ही आता रस्त्यात येणारे पाण्याचे स्त्रोत, विहिरी बुजवू लागला आहात. त्या निर्जीव रस्त्यासाठी जिवंत पाणी तुम्ही नष्ट करीत आहात. आज कोकणातील व एकंदरीत महाराष्ट्रातील पाण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. रत्नागिरीतल्या विहिरींच्या पाण्याची पातळी खाली-खाली जात चालली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, चिपळूणला सप्टेंबर २०१३ मध्ये सरासरी पाणी पातळी १.६८ होती म्हणजे इतक्या खोलीवर पाणी लागत होते आणि आता मे २०१८ ला पाणी पातळी ४.७२ आहे इतकी पाण्याची पातळी खाली गेली आहे. कारण पुनर्भरण होत नाहीये. जंगले, झाडे, देवराया शिल्लक राहिल्या नाहीत; आणि जे काही शिल्लक आहे ते पण जाणार आहे. वाहून आलेली माती नदीच्या पत्रात व धरणात, बंधार्यात जाऊन स्थिरावू लागल्याने जमिनीत मुरणारे पाणी बंद झाले आहे. फक्त उपसाच होत राहिल्याने पाण्याची पातळी उतरू लागली आहे, कमी होऊ लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून जमिनीची ओल कमी झाली उष्णता वाढली. जमीन तापली त्यामुळे पिकांसाठी पाण्याची गरज वाढली. सर्व साधारण पाण्याची गरज दर माणशी दररोज २०० ते २५० लिटर आणि शेतीला दर हेक्टरी ५००० घ.मी. एवढी असते. पण तशी स्थिती अजिबात नाहीये आणि त्यात असलेले पाणी तुम्ही बुजवता आहात.
लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. त्या प्रमाणात पाण्याच्या व अन्नधान्याच्या गरजा देखिल वाढत आहेत. तरी देखिल या गोष्टींचा विचार न करता आपण सुपीक जमीन, जी धन्य पिकवून लोकांचे पोषण करते, तीचा वापर निर्जीव गाड्यांच्या रस्त्यासाठी करू पहात आहात. तीच गोष्ट विहिरीं बाबत आहे.
निसर्गाने प्रत्येक सजीवासाठी जागा निर्माण केल्या आहेत. माणूस व प्राण्यांसाठी जमीन – त्यात प्राण्यांसाठी जंगले, माशांसाठी पाणी, पक्षांसाठी आकाश व झाडे ही सर्वांसाठी अशी निर्माण केली. तरी सुद्धा निवासस्थानासाठी हे पक्षी झाडांचा आधार घेतात. तसेच माकड, साप, खारी हे देखिल त्यांचा आश्रय घेतात. त्या वरची फळे हे त्यांचे खाद्य असते. सगळ्यांना ती सावली देतात. सगळ्यात जास्ती माणूसच त्यांचा उपयोग करून घेतो. असे असतांना सगळ्यांच्या जागेवर माणसाने अतिक्रमण केले आणि त्यांना जगणे मुष्कील केले. आणि आता झाडे नष्ट करून तीच आधार असणार्या जीवांना निराधार केले जात आहे.
माणसाचे होणारे नुकसान तुम्ही पैशाने भरून देऊ शकता, पण ह्या निरपराध जीवांचे होणारे नुकसान कसे भरून देणार आहात? ती पण तुमचीच प्रजा आहे मुख्यमंत्रीजी ! लोक पाण्याची सोय पाणी विकत घेऊन करतील प्राणी-पक्षी पाणी कोठून पितील? त्यांच्यासाठी पाण्याची सोय काय? सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा तो विकास असे असतांना फक्त काही माणसांसाठी संपूर्ण निसर्ग उद्ध्वस्त करणारा तो विकास असे कसे म्हणू शकता?
जगभरात सगळीकडे खाजगीकरण सुरु आहे. पाण्याचे खाजगीकरण करून त्याची बाजारपेठ केली जात आहे. ही मुक्त बाजारपेठ पाण्याचे दर ठरवते. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे पैसा हा जागतिक व्यवहाराच्या केंद्रस्थानी आला आणि जागतिक बँकेचे महत्व वाढले. जगाच्या आर्थिक घडामोडीवर ती नियंत्रण ठेवू लागली. या बँकेने आर्थिक मदत देण्यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्यात पाण्याचे खाजगीकरण ही महत्वाची अट आहे. त्यांच्या मते पाण्याच्या किंमती वाढणे ही चांगली गोष्ट आहे. खाजगी कंपन्या चीनचा पाणीपुरवठा काबीज करीत आहेत. तेथील सामान्य जनतेला पाण्याचे दर परवडण्याच्या पलीकडे गेले आहेत. पाणी असूनही ते विकत घेण्यास पैसे नसल्याने ते वापरता येत नाही. अमेरिकेत देखिल हीच परिस्थिती आहे .
श्री. धाराशिवकर त्यांच्या पुस्तकात लिहितात: न्यू अलास्का बॉटलींग कंपनीने उत्तर ध्रुवा वरील ब्लू लेक नावाच्या सरोवरातून १३ अब्ज गॅलन पाणी दर वर्षी उचलण्याचे हक्क विकत घेतले आहेत. हे पाणी तिथून टँकरने भरून भारतात- मुंबई जवळील एका कारखान्यात येऊन, बाटल्यात भरून बाजार पेठेत विक्रीला जाईल. दुसरी आणखी एक कंपनी भारतात असा कारखाना उभारू इच्छीत आहे.
ह्यांना मदत म्हणून तर असलेले पाण्याचे स्रोत नष्ट केले जात नाहीत ना? झाडे, जंगले नष्ट करून पुनर्भरण होणारच नाही याची खबरदारी तर घेतली जात नाहीये ना?
हा सर्व निसर्ग नष्ट करताना पुढच्या पिढीचा तुम्ही विचार केला आहे का? त्यांनी झाडे, जंगले, विहिरी, पशु, पक्षी फक्त चित्रातच पहायचे का? पाण्याच्या मोठ्या कॅनलाच विहीर समजायचं का? तोंडाला मास्क लावून कृत्रिम प्राणवायू वरच जगायचं का? मला तुम्हाला विचारावस वाटत की खरच ही परिस्तिथी निर्माण होते आहे ती तुम्हाला दिसत नाही का? याची जाणीव तुम्हाला होत नाही का? मला आपणांस सांगावेसे वाटते ह्या विकासाच्या मागे लागून सुरु केलेला उत्पात थांबवा. सगळे भकास करू नका. आता तरी थांबा!
आपली विश्वासू
डॉ. मीनल माधव
पर्यावरण अभ्यासक