आता कोरोनाचे तात्काळ होणार निदान ; जळगाव मनपाने मागविल्या ७५ हजार अँटीजन टेस्ट किट

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांचे अहवाल येण्यास उशीर होत असल्याने वेळेचा अपव्यय होतो आणि रुग्णांवर उपचार होण्यास देखील विलंब होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान लवकर व्हावे यासाठी अँटीजन टेस्ट किट मागविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महापौर भारतीताई सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. महापौरांच्या मागणीला प्रतिसाद जिल्हा प्रशासनाकडून अँटीजन टेस्ट किट मागविण्यात येणार असून जळगाव मनपाकडून ७५ हजार किट मागविण्यात आल्या आहेत.

 

देशासह जळगांव शहरात कोरोना व्हायरस (कोविड १९) चा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात पसरलेला असून त्यास समस्त देशवासी, कोरोना वारीयर्स लढा देत आहे. सद्यस्थितीत शहरातील नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवणेसाठी जिल्हा प्रशासनासह महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. शहरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून जळगांव शहरासह जिल्ह्याच्या मृत्युदराची स्थिती सर्वाधिक असल्याची बाब चिंताजनक आहे. राज्यातील प्रमुख मुंबई, पुणे, ठाणे यासह मोठ्या महानगरांच्या तुलनेत देशात कोराना बाधितांच्या मृत्युदरात जळगांव शहरासह जिल्ह्याने महाराष्ट्रातील असंख्य महानगरांना मागे सोडलेले आहे.

 

सद्यस्थितीत विविध मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी नागरीकांमध्ये कोरोना व्हायरस (कोविड १९) तपासणी करणे कामी अँटीजन टेस्टचा वापर करण्यात येत असून या टेस्टव्दारे किमान अर्ध्या तासामध्ये रुग्ण बाधित किंवा अबाधित असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे रुग्णांवर तात्काळ उपचारास सुरुवात करण्यात येते. मात्र आपल्या शहरात या टेस्ट किट उपलब्ध नसल्यामुळे मूळ बाधितांसह त्यांचे जवळीक संपर्कातील नागरीक यांचे स्वॅब घेवून त्यांना कित्येक दिवस क्वॉरंटाईन ठेवण्यात येते. परिणामी वेळ अपव्यय मनुष्यबळ देखील खर्ची होतो आणि उपचारास विलंब देखील होतो. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच शहरवासियांचे आरोग्य अबाधित ठेवणे कामी शासनाकडून परवानगी घेवून अँटीजन टेस्ट किट जळगांव शहरास उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांचा जीव वाचविणे शक्य होईल, तरी जळगाव शहरात अँटीजन टेस्टचा लवकरात लवकर उपयोग करण्याकामी शासनाच्या परवानगीसाठी पाठपुरावा करावा तसेच त्यासाठी आवश्यक उपाययोजना उभारण्यासाठी योग्य ती तजवीज करावी अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

 

जळगाव मनपाला मिळणार ७५ हजार किट

जळगाव शहराची लोकसंख्या ५ लाखांपेक्षा अधिक असून सध्यास्थितीत दररोज सरासरी ४० रुग्ण वाढत आहे. प्रत्येक रुग्णामागे विलगीकरण केल्या जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण देखील अधिक आहे. सद्यस्थितीत रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळीच उपचार मिळत नाही तसेच वेळेचा देखील अपव्यय होतो. जळगावकरांचे आरोग्यहित लक्षात घेता मनपा प्रशासनाकडून ७५ हजार अँटीजन टेस्ट किटची मागणी करण्यात आली आहे. नाशिक विभागीय आरोग्य कार्यालयाकडून जळगाव मनपाला या किट लवकरच उपलब्ध होणार आहेत.

 

कशी होते अँटीजन टेस्ट

अँटीजन टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेतले जातात. एका छोट्या मशीनवर याची तपासणी शक्य आहे. ज्या कीटवर तपासणी होते त्यावर दोन लाल रेषा दिसून आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. एकच लाल रेषा कीटवर दिसून आल्यास रुग्ण निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते.

 

प्रशासनाने योग्य तयारी करून ठेवावी : महापौर

जळगाव शहर मनपाला अँटीजन टेस्ट किट लवकरच उपलब्ध होणार आहे. किटचा उपयोग कसा करावा, त्यासाठी काय सोय असावी, कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याची मनपा प्रशासनाने तयारी करून ठेवावी, असे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले आहे.

Protected Content