‘आई’ म्हणायचं की फक्त ‘जन्म देणारी व्यक्ती’? ; अमेरिकेच्या अर्थसंकल्पातील उल्लेखावरून वाद

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिकेत सध्या ‘आई’ की ‘जन्म देणारी व्यक्ती’ हा वाद आणि त्यावरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  त्याला कारण ठरलाय अमेरिकेतील बायडन सरकारचा नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प! 

 

यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात बायडन सरकारने प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूवर लक्ष केंद्रीत करून तो मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न प्रस्तावित केले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी बायडन सरकारने भरीव निधीची तरतूद देखील केली आहे. मात्र, यामध्ये केलेल्या एका चुकीमुळे सध्या अमेरिकन सरकारवर टिकेची झोड उठली आहे. कारण यासंदर्भातल्या योजनांमध्ये आईचा उल्लेख जन्म देणारी व्यक्ती असा करण्यात आला आहे. त्यावरून आता अमेरिकेत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

 

अमेरिकन सरकराने नुकताच आपला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भात सविस्तर तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यात प्रसूतीवेळी होणारे मातांचे मृत्यू कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. विशिष्ट वर्णाच्या नागरिकांमध्ये देखील हे प्रमाण जास्त असून त्यासंदर्भात देखील तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या तरतुदींचा उल्लेख करताना आर्थिक प्रशासनानं अर्थसंकल्पातच ‘आई’ असा उल्लेख न करता ‘जन्म देणारी व्यक्ती’ असा उल्लेख केल्यामुळे हा वाद सुरू झाला.

 

हा उल्लेख जाहीर होताच यावर टीका करण्यात येऊ लागली आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या गटाकडून या उल्लेखाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. “असा उल्लेख केल्यामुळे महिलांचं अस्तित्व फक्त मुलांना जन्म देणाऱ्या मशिनइतकंच मान्य करण्याचा प्रकार घडला आहे. असा उल्लेख करणं हा त्यांच्या मातृत्वाचा अपमान आहे”, अशी टीका करण्यात येऊ लागली आहे. बायडन सरकारला आई हा शब्द काढून टाकण्याची काय गरज होती? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.

 

त्याचवेळी दुसरीकडे अशा उल्लेखाचं समर्थन देखील केलं जात आहे. अमेरिकेतील NARAL या स्वयंसेवी संस्थेनं ‘जन्म देणारे’ ही सर्वसमावेशक संज्ञा असल्याचं म्हटलं आहे. ‘जेव्हा आपण जन्म देणारे असं म्हणतो, तेव्हा ती संज्ञा सर्वसमावेशक होते. हे इतकं सोपं आहे. कारण जन्म देण्याचं स्वातंत्र्य हे सगळ्यांसाठी आहे’, असा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.