आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त नियोजन भवनात कार्यशाळा (व्हिडीओ)

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त गुरूवार १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सेवक आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष-2023 जळगाव जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून, जिल्ह्यातील अतिदुर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार असून तृणधान्ये हे निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे होणार्‍या व्याधींना टाळण्यासाठी ते उपयुक्त आहे. यामुळे निरोगी राहण्यासह जमीन चांगली राखण्यासाठी पौष्टीक तृणधान्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजीराव ठाकूर यांनी केले.

पुढे बोलतांना ते ठाकूर म्हणाले की, या अंतर्गत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, महिला बचतगट, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्ह्यात महिनानिहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय, लागवड पद्धती, ग्राम कृषी सभेमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत चर्चा व मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्य प्रक्रियाबाबत प्रशिक्षण, आहार तज्ज्ञांशी संवाद, विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन, महिला बचतगटांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाट्य इत्यादी माध्यमांतून प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. असेही संभाजी ठाकूर यांनी बोलतांना सांगितले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content