अमळनेरात लॉकडाऊनला प्रतिसाद; रस्ते निर्मनुष्य

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार येथील सात दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. शहरातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली असून रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.

store advt

जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केल्यानुसार मंगळवारपासून अमळनेर पालिका हद्दीत सात दिवसांचा (७ ते १३ जुलै) लॉकडाऊन सुरू झाला. याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दवाखाने, मेडिकल्स, दूध डेअर्‍या, कृषी केंद्र व परवानगी असलेली प्रतिष्ठाने वगळता बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद होती. शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते, वर्दळीच्या चौकातही दिवसभर कुणी दिसून आले नाही.

कुणी लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये यासाठी पोलीस प्रशासन अगदी सकाळपासूनच दक्ष होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी हे वाहनधारकांची तपासणी करत होते. अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, निरीक्षक अंबादास मोरे, एपीपीआय प्रकाश सदगीर, एपीआय लक्षण ढोबळे हे थेट रस्त्यावर उतरले. लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरणार्‍यांवर त्यांनी कारवाई करत ९७ जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी विना परवाना फिरणारे, मास्क न लावणारे आणि लॉकडाऊनच्या उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली असून आज दुसर्‍या दिवशी देखील याच प्रकारे सक्तीची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच्या सोबतीला महसूल प्रशासनातर्फे तहसीलदार मिलिंद वाघ व पालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होते की नाही यासाठी शहरात ठिकठिकाणी भेट दिली.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!