मुंबई : वृत्तसंस्था । टीआरपी घोटाळ्यामध्ये पोलिसांनी चौकशीचा फास अधिकच आवळल्याने संशयित आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण येत आहेत. अमित उर्फ अजित उर्फ महाडिक उर्फ अभिजित कोलावडे अशी नावे असलेल्या आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्याच्या अटकेमुळे आरोपींची संख्या दहावर पोहचली आहे.
पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक टीव्ही अशी पाच वाहिन्यांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या वाहिन्या तसेच टीआरपी वाढविण्यासाठी पैसे घेणाऱ्या त्यांच्या साथीदारांनी आर्थिक व्यवहारासाठी बोगस कंपन्या थाटल्याचेही समोर आले आहे. घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आरोपींची संख्या देखील वाढत आहे. नऊ आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये अभिजित याचे नाव समोर आले होते. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके केल्यानंतर ते कधीही आपल्यापर्यंत पोहचतील या शक्यतेने अभिजित याने वकिलांच्या सल्ल्यानुसार शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या अटकेमुळे आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे