अजंग ते तरसोद चौपदरीकरणाचा निकृष्ट कामाची चौकशी करा : आमदार चिमणराव पाटील यांची मागणी

पारोळा,  प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अजंग ते तरसोद चौपदरीकरणाचा निकृष्ट कामाची चौकशी करून काम जलद गतीने करा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

 

पत्राचा आशय असा की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम गेल्या कित्तेक दशकापासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच मोठी गैरसोय होतांना दिसत आहे. या महामार्गावरील अजंग ते तरसोद पर्यंतच्या अंतरात रहदारी मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसाला अनेक अपघात होत असतात. रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून महामार्गावरच रस्त्याला खोलवर खड्डे पडलेले आहेत. छोट्या मोठ्या वाहनांना रात्रीचा प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे. सध्या सुरू असलेल्या कामात धुळे- जळगांव दरम्यान एखादा टप्पा पूर्ण झाला कि तो रहदारीस मोकळा करण्यात येतो परंतु निकृष्ट दर्ज्याच्या कामामुळे नवा रस्ता देखील काही दिवसांनी जुन्या रस्त्यापेक्षा खराब होत आहे. तसेच काम देखील अत्यंत संथ गतीने सुरु आहे. निकृष्ठ कामामुळे नवीन बनवलेल्या रस्त्याला देखील खोलवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी काम सुरु असल्याचे कुठे फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह दिसून येत नाही. त्यामुळे रात्री अनेक ठिकाणी अपघात होवून जीवितहानी होत आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाचे खोदकाम प्रमाणात खदानीत न करता मक्तेदार सोयीच्या कुठल्याही जागी खोदकाम करीत असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ-मोठे खड्डे होवून पावसाचे पाणी साचून रहदारीवर अंदाज येत नसतो. त्यामुळे मनुष्यजिवितहानी अथवा पशुधनाची जिवित हानी होत असते.  रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्ज्याचे होत असून नागरिकांचा जीवाचा खेळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे आमच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींना व जनतेला अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच उपरोक्त परिस्थितीचा आम्हाला देखील सामना करावा लागत आहे. उपरोक्त परिस्थिती अत्यंत गंभीर असून यावर त्वरित कार्यवाही करणे गरजेचे असून जनतेच्या समस्या सोडविणे अत्यंत आवश्यक आहे. आपण संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून योग्य आदेश निर्गमित करून सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी. तसेच सदरील काम पूर्ण करणेसाठी जलद गतीने काम करण्याचा सूचना संबंधितांना देण्यात याव्या अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी भारत सरकारचे रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचेकडे केलेली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!